उल्हासनगरात आज रिक्षांचा कडकडीत बंद

उल्हासनगर,दि.५(वार्ताहर)-वारंवार निवेदन दिल्यावरही खड्डे भरण्याबाबत उदासीनता दाखवणार्‍या पालिकेच्या विरोधात रिक्षा युनियनचे नेते एकवटले आहेत. या उदासीनतेच्या निषेधार्थ आज रात्री १२ वाजेपासून सोमवारपर्यंत साडेपाच हजार रिक्षांचा कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. उल्हासनगरात सुमारे साडेपाच हजार रिक्षा प्रमुख रोड, बाजारपेठा, स्टेशन परिसरात धावतात. मात्र बहुतांश रोडवर खड्डे पडले असून त्यात वारंवार रिक्षा आदळतात.रिक्षांना गॅरेज गाठावे लागते.हि बाब शिवसेना प्रणित कै.रमाकांत चव्हाण रिक्षा युनियन, शहीद मारोतीराव जाधव रिक्षा युनियन,रिपब्लिकन रिक्षा युनियन आदींनी संयुक्तरित्या पालिकेला दिलेल्या निदर्शनास आणून दिली होती. लवकरात लवकर रोडची दुरुस्ती,डागडुजी,डांबरीकरण केले नाही तर रिक्षा बेमुदत बंद ठेवल्या जातील, असा इशारा दिला होता. मात्र मागच्या महिन्यात दिलेल्या दोन निवेदनाकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यावर एकवटलेल्या रविंद्रसिंह(पिंकी)भुल्लर, शेखर यादव, राजा पाटील, जगदीश(रिचा)करोतिया, संजय तरे, संदिप गायकवाड रिक्षा युनियनच्या नेत्यांनी बंद घोषित केला आहे. शिवसेनेचा या आंदोलनाला जाहिर पाठिंबा असल्याची माहिती शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी डांबरीकरणच्या कामास सुरवात झाली आहे, असे सांगितले.