कृष्णकुंजबाहेरच बसणार फेरीवाले

मुंबई,दि.१६(वार्ताहर)-फेरीवाल्यांवरुन राज्यभरात आंदोलन छेडणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरच आता फेरीवाले बसणार आहेत. फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार करण्यात आले असून त्यापैकी एक हॉकर्स झोन हा राज ठाकरे यांच्या घरासमोर आणि घराच्या मागच्या बाजूला असणार आहे. एम.बी.राऊत आणि केळुसकर मार्ग या दोन्ही रस्त्यांवर प्रत्येकी दहा अशा एकूण २० फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, सध्या या रस्त्यांवर एकही फेरीवाला बसत नाही. तसेच या परिसरात शाळा असल्याने हॉकर्स झोन तयार करण्याचा नियमावलीचे उल्लंघन करण्यात आल्याचे मनसे पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेने मुद्दाम राज ठाकरे यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांना जागा दिल्याचा आरोपही मनसेने केला आहे. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर कॉंग्रेस आणि मनसेत राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर आता न्यायालयाच्या निर्णयानुसार हॉकर्स झोन तयार करण्यात आले आहेत.दरम्यान, महापालिकेने हॉकर्स झोनमधील रस्त्यांची यादी यापूर्वीच जाहीर केली आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत. त्यावर विचार होऊन मगच अंतिम यादी तयार करण्यात येईल.