नगराध्यक्षपदासाठी बदलापुरात राजकीय हालचालींना वेग

बदलापूर,दि.५(वार्ताहर)- बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडीच्या पोर्शभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत नवीन नगराध्यक्षांची निवड होणार आहे. आगामी नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका विजया राऊत यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेना उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांनी व्यक्त केली आहे. नगरपरिषदेचे आगामी नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. विद्यमान नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नगराध्यक्षपदाचा वर्षाचा कालावधी या महिन्यात पूर्ण होत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १८ तारखेपर्यंत नव्या नगराध्यक्षांची निवड होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच हे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे.माजी नगरसेवक व शिवसेना उपशहर प्रमुख दिवंगत मोहन राऊत यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे यांच्या पत्नी नगरसेविका विजया राऊत यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याची मागणी उपशहरप्रमुख राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या व पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या राऊत कुटुंबाला न्याय द्यावा, अशी विनंती पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांना करण्यात आली असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले. पक्षातील सर्व नगरसेवकांची विजया राऊत यांच्या नावाला सहमती असल्याचा दावाही प्रवीण राऊत यांनी केला. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो मान्य असेल असेही प्रवीण राऊत यांनी स्पष्ट केले.