पोलिसांनी पाजले थर्टीफर्स्टला दूध!

अंबरनाथ,दि.१(वार्ताहर)-नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे पार्ट्या रंगात आलेल्या असताना अंबरनाथ पोलिसांनी मात्र नागरिकांना दूधवाटप करत दारूऐवजी दूध पिऊन तंदुरुस्त रहाण्याचे आवाहन केले. नववर्षाच्या स्वागताला उत्साहाच्या नादात अनेकजण मद्यपान करतात आणि तशाच अवस्थेत गाड्या चालवतात. यामुळे अपघातांची संख्या वाढत असतानाच दारूमुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अंबरनाथ पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिमेकडील विम्को नाक्यावर नाकाबंदी तर लावलीच, शिवाय बाजूलाच दूध वाटप केले. अंबरनाथमधील पोलीस मित्रांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. नाकाबंदीसाठी थांबलेल्या वाहनचालक आणि पादचार्‍यांना पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ आग्रहाने दूध पिण्याचे वाहन करताना दिसत होते, दारूपासून दूर राहून दूध प्या आणि तंदुरुस्त राहा असा संदेश यावेळी पोलिसांनी दिला. यावेळी तब्बल १०० लिटर दुध वाटण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते युसूफ शेख, अझीझ भाई शेख,ऍड. असिफ पठाण आदी पोलीस मित्रानी पोलिसांना सहकार्य केले.