राष्ट्रवादीचे कल्याण; पंचायत मात्र सेनेची

कल्याण,दि.८(वार्ताहर)-पंचायत समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेची पंचायत झाली असून निवडणुकीत एकत्र लढणार्‍या राष्ट्रवादीने सभापती पदाच्या आमिषाला बळी पडत शिवसेनेची साथ सोडली आहे. सत्तेच्या या राजकारणात भाजपा सरशी ठरली आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सेनेच्या ताब्यात असलेल्या गडाला सुरुंग लागला आहे. सोमवारी झालेल्या कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांची सभापतीपदी तर भाजपाचे पांडुरंग म्हात्रे विजयी झाले आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती करत एकत्र निवडणूक लढवली होती. पंचायत समितीच्या बारा गणांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना ४, भाजप ५, राष्ट्रवादी ३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे कल्याण पंचायत समितीवर शिवसेना राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार शिवसेनेच्या वतीने राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या भरत गोंधळे यांना सभापती पदाची उमेदवारी दिली. तर भाजपाने देखील सत्तेच्या राजकारणात सेनेला मात करण्यासाठी राष्ट्रवादीच्याच दोन सदस्यांना गळाला लावत दर्शना जाधव यांना सभपती पदाची उमेदवारी दिली. यामुळे भाजपाचे पक्षीय बलाबल वाढून भाजपाच्या वतीने निवडणूक लढवलेल्या दर्शना जाधव या भरत गोंधळे यांचा पराभव करत विजयी झाल्या. तर उप सभापती सेनेच्या भरत भोईर यांचा पराभव करत पांडुरंग म्हात्रे विजयी झाले आहेत. दरम्यान भाजपाच्या या खेळीने शिवसेना नेत्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे.