शहापुरातील खड्डयांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे

शहापूर,दि.२५(वार्ताहर)-शहापूर तालुक्यात विविध फंडातून झालेल्या रस्त्याच्या कामांची चौकशी करुन दोषी असलेले अधिकारी आणि ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी भारतीय ट्रेड युनियन (सीटू)संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कॉ.विजय विशे, नवनाथ पावसे, मनिष फोडसे, अशोक विशे, दशरथ पाचघरे, प्रशांत महाजन, रघुनाथ तारमळे, मयुर निमसे, संजय वाढविन्दे, विष्णु सासे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे आणि रविंद्र चंदे आदी पदाधिकारी हजर होते. शहापुर या आदिवासी बहुल तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून तालुक्यात शहापूर-शेणवा-डोळखांब, शेणवा-किन्हवली, सापगाव- दहिवली, शेन्द्रूण-गेगाव नांदवळ, शहापूर शहरातील अंतर्गत रस्ते आणि इतर रस्त्यावर शासनाचे करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र अल्पावधितच या डांबरी रस्त्याची चाळण झाली आहे तर काही ठिकाणी दोन-दोन फुटांचे खड्डे पडले आहेत, पर्यायाने यामुळे वाहनचालक अक्षरशः हैराण झाले असून दररोज जीवघेणे अपघात होत आहेत.दूर्गम भागातून रूग्ण आणि नागरिक यांना तालूक्याच्या ठिकाणी पोहचण्यासाठी अनेक शाररिक व मानसिक यातना सहन कराव्या लागतात या कामांमधून ठेकेदार आणि अधिकारी शासनाचे लाखो रुपये हडप करुन जनतेला वेठीस धरत आहेत, असा आरोप आहे.तक्रारीला चुकीची ऊत्तरे देऊन ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम केले जातआहे. सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई खाडे यांनी आंदोलन केल्यावर त्यांनादेखील खोटे लेखी ओशासन दिल्याचे निवेदनात नमूद केले आहे.