जिल्हा

सिव्हिलमध्ये रुग्णांच्या मनगटावर बांधली मायेची राखी

सिव्हिलमध्ये रुग्णांच्या मनगटावर बांधली मायेची राखी
सिव्हिलमध्ये रुग्णांच्या मनगटावर बांधली मायेची राखी फोटो: ठाणे वैभव

औषधांसोबत मिळाला स्नेहाचा धागा

ठाणे : सिव्हिल रुग्णालयाच्या वातावरणात मायेचा स्नेह दरवळला. आजाराच्या वेदनांशी झुंजणाऱ्या रुग्णांच्या मनगटावर महिला डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी राखी बांधून औषधांसोबत आपुलकीची ऊब दिली. कुटुंबापासून दूर असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर या मायेच्या धाग्याने हास्य फुलले.

ठाणे सिव्हिल रुग्णालयात रक्षाबंधनानिमित्त अनोखा आणि हृदयस्पर्शी सोहळा पार पडला. विविध वॉर्डमधील रुग्णांना महिला डॉक्टर, परिचारिका आणि महिला कर्मचाऱ्यांनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या. रुग्णांना चॉकलेट व मिठाईचे वाटपही करण्यात आले. काही रुग्ण भावुक झाले, तर काहींनी महिला कर्मचाऱ्यांना आशीर्वाद देत कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला रक्षाबंधनाचा हा उपक्रम केवळ सणापुरता मर्यादित न राहता रुग्ण आणि आरोग्यसेवकांमधील विश्वासाचे बंध अधिक घट्ट करणारा ठरला. औषध शरीरावर उपचार करतात; मात्र मायेचा स्पर्श मनालाही बळ देतो, याचा प्रत्यय या उपक्रमातून आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राहुड, मेट्रन सारिका शेणेकर, भाग्यश्री बारटक्के, विनोद जोशी आदी उपस्थित होते.

रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा केवळ ‘केस’ किंवा ‘रुग्ण क्रमांक’ नसतो, तर तो आपल्या कुटुंबाचा एक भाग असतो. उपचारांसोबत मायेचा आणि मानसिक आधार देणेही महत्त्वाचे आहे. राखीच्या या धाग्यात प्रेम, विश्वास आणि माणुसकीची ऊब आहे, अशा शब्दांत डॉ. कैलास पवार यांनी भावना व्यक्त केल्या.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600